अखेर शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ असे ‘करून दाखवले’ : अतुल भातखळकर


मुंबई – भाजपने शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वरून आता शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेने शिवशाही हे कॅलेंडर भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह छापले असून सध्या त्याचे काही फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. शिवशाही कॅलेंडरचा फोटो टॅग करत शिवसेनेवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवशाही कॅलेंडरचा एक फोटो भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी यासोबत शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे म्हणत खोचक टोला लगावला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून शिवसेनेने वैचारिक सुंता करून घ्यावा, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.


मी अजान स्पर्धेचे आयोजन केले त्यावेळीच म्हटले होते की आता भगवा तर शिवसेनेने सोडलाच केवळ हिरवा हाती घेणे बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने उर्दूमध्येच कॅलेंडर काढले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जनाब बळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. यामध्ये उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही देण्याचे काम केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतींच्या दिवशी केवळ शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस यातून करण्यात आले आहे. मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असेही ते म्हणाले. औरंगाबादचे संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असे करून दाखवल्याचेही ते म्हणाले.

शिवशाही कॅलेंडर २०२१ असे या कॅलेंडरवर नमूद करण्यात आले आहे. मराठी इंग्रजीसोबतच यावर उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसेच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला आहे.