बी.जी. कोळसे पाटलांनी जाहीर केली पुण्यातील एल्गार परिषदेची नवी तारीख


पुणे : केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवू नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना देखील मनाई करण्यात आली असताना एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुण्यात एल्गार परिषद होणारच, अशी घोषणा केली आहे. त्याचबरोर परिषदेची नवी तारीख देखील त्यांनी जाहीर केली आहे.

पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात येत्या 30 जानेवारीला एल्गार परिषद घेण्यात येईल, अशी घोषणा बी.जी. कोळसे-पाटील यांनी केली आहे. सभागृहात राज्य सरकारने परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा देखील इशारा कोळसे-पाटील यांनी दिला आहे. शेवटी जेलभरोची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत कोळसे पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी 1 जानेवारीला पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली होती. त्याचबरोबर कोळसे पाटील म्हणाले, अन्न वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य शिक्षण याभोवती राजकारण फिरायला हवे. पण हिंदू-मुस्लिम, लव्ह-जिहाद, जात-पात-धर्मानुसार राजकारण फिरत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून याचा लढा लढत आलो आहे. तो यापुढेही कायम राहील. लोकशाहीवादी, आंबेडकरवादी युवावर्गच पुढे येऊन काम करत असल्याचेही कोळसे पाटील यांनी सांगितले.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो दाखवतो. सरकार कुणाचेही आले तरी बाटली जुनी आहे पाणी नवीन आहे. सरकार कुठलेही आले तरी मनुवादी विचाराने बुरसटलेलेच असल्याची टीका कोळसे पाटील यांनी यावेळी केली. राज्यात नवीन सरकार आले आणि त्यांनी माझी सुरक्षा काढून घेतली. लोकशाही ज्या संस्थांवर अवलंबून त्या कशा काम करत आहेत हे मला माहिती आहे. जाती धर्माची कीड देशाला लागली त्यातून कसा बाहेर निघणार हा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली.

आम्ही दरवर्षी 31 डिसेंबरला एल्गार परिषद घेत असतो. मी त्याचा संयोजक आहे आणि राहणार. एल्गार परिषदेला आमचा एकही पैसा लागलेला नाही. आमच्यावर कुठे बंधने घातली, खोटे आरोप केले. मूलभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि क्वालिटी शिक्षण मिळावे यासाठी एल्गार परिषदचे आयोजन करत असल्याची माहिती कोळसे पाटील यांनी दिली.

त्याचबरोबर सगळ्या संस्था माझ्याकडे येऊन गेल्या. त्यांच्या हाती काही लागले नाही. ईडी आली तर ती वेडी होईल, अशा शब्दांत कोळसे पाटील यांनी टीका केली. नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा वाईट काय असू शकते? असे त्यांनी सांगितले. ज्यांना एल्गार परिषदे प्रकरणी अटक केली त्यांना सोडा नाहीतर, सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा न्या, मला वेळ मिळाला तर मी पण सहभागी होईन, असाही इशारा कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.