भारत- चीन लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेचे आयोजन अधांतरी


नवी दिल्ली: लद्दाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पातळीवरील चर्चेत भारत आणि चीन या दोन्ही देशांनी लष्करी उच्चाधिकाऱ्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. मात्र, ही चर्चा नेमकी होणार, हे मात्र अधांतरीच आहे, अशी माहिती परराष्ट्र विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांचे सैन्य त्वरित आणि पूर्णपणे माघारी घेण्याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेची फेरी लवकरात कलाकार आयोजित करण्याला दि. १८ डिसेंबर झालेल्या सल्ला आणि समन्वय यंत्रणेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्यानुसार लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याबाबत दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत आणि तास प्रस्तावही ठेवण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या असून त्यामध्ये सीमेवरील तणाव दूर करण्याच्या दृष्टीने कोणताही ठोस निर्णय घेण्यात अपयश आले आहे.

चर्चेच्या आठव्या फेरीमध्ये भारतीय सैन्य आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मान्य केले होते की एकमेकांसमोर थकलेली दोन्ही सैन्य संयमाचे वर्तन ठेवतील आणि परस्परांविषयी गैरसमजातून कोणतेही आततायी पाऊल उचलणार नाहीत.

वास्तविक जोपर्यंत राजनैतिक पातळीवरून संबंध सुरळीत केले जात नाहीत तोपर्यंत लष्करी पातळीवरील चर्चांना काही अर्थच उरात नाही, असे मत लष्कराच्या उत्तर विभागाचे निवृत्त कमांडर लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डा यांनी व्यक्त केले. भारत आणि चीन दोघेही लद्दाख क्षेत्रात दीर्घकाळच्या संघर्षांसाठी सज्ज आहेत आणि कडाक्याची थंडी असूनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपापल्या आघाड्यांवर ठाण मांडून बसण्यावर ठाम आहेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी सैन्य माघारीसंदर्भात पुढाकार घेतला गेला असता तर त्याला काही अर्थ होता. आता ऐन हिवाळ्यात सैन्याने ठाणी सांभाळण्याची जय्यत तयारी केली असताना या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता धूसर असल्याचेही त्यांनी नमूद केले.