देशातील सर्वात वेगवान ‘KRIDN’ इलेक्ट्रीक बाईकचे वितरण सुरू


बंगळुरू: देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक असलेल्या ‘KRIDN’ या बाईकचे वितरण सुरू झाले असून हैदराबाद आणि बंगळुरू या ठिकाणी या गाड्या वितरित करण्यात येत आहेत ताशी ९५ किलोमीटर वेगाने धावणारी भारतात उपलब्ध असलेली पहिली आणि आतापर्यंत एकमेव बाईक आहे.

‘वन इलेक्ट्रीक’ या विजेवरील दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या ‘स्टार्ट अप’ने विकसित केलेली ही गाडी जानेवारीपासून तामिळनाडू आणि केरळ येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच तिचे महाराष्ट्र आणि दिल्ली येथे वितरण सुरू करण्यात येईल.

‘क्रीडन’ अर्थात खेळणे या संस्कृत शब्दावरून या बाईकचे नामकरण करण्यात आले आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख २६ हजार रुपये एवढी आहे. या बाईकला ५. ५ किलो वॅट, अर्थात ७. ४ बीएचपी क्षमतेची मोटर बसविण्यात आली आहे. तिचा टॉर्क आऊटपुट १६० एनएम एवढा आहे. बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क तर मागच्या बाजूला दुहेरी शॉक ऍबसॉर्बर्स देण्यात आले आहेत. बाईकला पुढील चाकाला २४० एमएम डिस्क आणि मागील चाकाला २२० एमएम डिस्क सह कंबाईंड ब्रेक सिस्टीम बसविण्यात आली आहे. ‘KRIDN’च्या उत्पादनासाठी ८० टक्के सुटे भाग स्वदेशी बनावटीचे वापरण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल ओडोमीटर या बाइकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यात ‘KRIDN’सह ‘KRIDN’ R अशा दोन प्रकारात ही बाईक उपलब्ध करून देण्यात येईल. बाईक टॅक्सी सेवा आणि लास्ट डिलिव्हरीज यासाठी या बाईकचा उपयोग करता येणार आहे.