न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी लसीचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


नवी दिल्ली: न्यूमोनियाला प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) विकसित केलेल्या ‘न्यूमोसिल’ या पहिल्या स्वदेशी लसीचे लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. ही लस विकसित करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसारख्या संस्थांनी सहकार्य केले आहे. एक डोसची वायल आणि अनेक डोसची बाटली अशा स्वरूपात किफायतशीर किंमतीत ही लास उपलब्ध करून देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

ही लस प्रामुख्याने लहान मुलांच्या न्यूमोनियावर उपचार करण्यासाठी वापरली जाईल. जगभरातील सर्वाधिक बालमृत्यू न्यूमोनियाने होत आहेत. कोरोना आणीबाणीच्या काळात ही लस विकसित करण्याचे कार्य उल्लेखनीय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाला (स्वावलंबी भारत) अनुरुप आहे, असे वर्धन यांनी नमूद केले.

डॉ. वर्धन म्हणाले, भारत आणि आफ्रिकेत प्रौढ, लहान मुले यांच्यामध्ये वेगवेगळ्या लसीकरण वेळापत्रकांचा वापर करून करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल (इंडिया) यांनी मान्यता दिल्यानंतर तिचे लोकार्पण करण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या लस १७० देशांमध्ये वापरल्या जातात. न्यूमोनियावरील संस्थेने विकसित केलेल्या या लसीमुळे विदेशी उत्पादकांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे, अशा शब्दात डॉ. वर्धन यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला.