नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच केले राजनाथ सिंह यांना ‘म्यूट’


चंदीगड: हिमाचल प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना जल्लोषात नाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे भाषण ‘म्यूट केले. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत घडला.

हिमाचल प्रदेश येथे भाजपचे सरकार स्थापन झाले त्याला या आठवड्यात ३ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त विविध ठिकाणी पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यापैकी एक कार्यक्रम सोलन येथेही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे व्हिडीओ माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. मात्र, काही कार्यकर्ते भाषणाचा आवाज ‘म्यूट’ करून पारंपारिक ‘नट्टी’ नृत्य करण्यात मश्गुल होते. या प्रकारचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप हे देखील उपस्थित होते. शिस्तबद्ध पक्ष म्हणविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या कृत्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.