अजिंक्यची शतकी खेळी भारतीय क्रिकेट इतिहासात संस्मरणीय: गावसकर


मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीतील अजिंक्य रहाणेची शतकी खेळी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी ठरू शकते. इतकेच नव्हे तर भारतीय क्रिकेटसाठीही ती ऐतिहासिक खेळी आहे, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विक्रमवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी अजिंक्यचे कौतुक केले. सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये १४७ धावा झळकावल्या होत्या.

पहिल्या डावात रहाणेच्या ११२ धावांच्या खेळीमुळे मेलबर्न कसोटीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधण्याच्या आशा पल्लवित झाल्या. दुसऱ्या डावात गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीने हा विजय साकार झाला.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजांनी केलेल्या संस्मरणीय शतकांमध्ये अजिंक्यच्या या ११२ धावांच्या खेळीला निश्चितपणे वरचे स्थान देणे आवश्यक आहे, असे गावसकर यांनी सांगितले. मेलबर्न येथील ११२ धावांची ही खेळी आपल्या कारकिर्दीतील महत्वाची खेळी असल्याचे अजिंक्यनेही मान्य केले. मात्र, आपल्याला व्यक्तिशः सन २०१४ मध्ये लॉर्डस् येथे केलेले शतक अधिक संस्मरणीय वाटते, असे त्याने सांगितले.