शेतकरी आंदोलकांसाठी ‘आप’ देणार मोफत ‘वाय-फाय’ सुविधा


नवी दिल्ली: शेतकरी आंदोलकांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे यासाठी सिघू सीमेवर आम आदमी पक्षाच्या वतीने मोफत वय फाय सिविधा उपलध करून देण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी दिली.

आंदोलनस्थळी इंटरनेट सुविधा दुबळी असल्याने आपल्याला आपल्या कुटुंबियांशी ‘व्हिडीओ कॉल’द्वारे संपर्क साधण्यास अडचणी येत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली. त्याची दाखल घेऊन ‘आप’च्या वतीने १०० मीटरपर्यंत कनेक्टिव्हिटी देणारे हॉट स्पॉट बसविण्यात येणार आहेत. जशी मागणी वाढेल, तशी हॉट स्पॉटसची संख्या वाढविण्यात येईल, असे चढ्ढा यांनी सांगितले.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. सध्याच्या काळात त्यात इंटरनेटची भर पडली आहे. त्यामुळे आपला पक्ष आंदोलक शेतकऱ्यांना इंटरनेट सुविधा मोफत उपलब्ध करून देणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आंदोलकांची फिरती शौचालये आणि पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे आदेश केजरीवाल यांनी दिले आहेत.