यापुढे अनिवार्य असू शकतो ‘व्हॅक्सिन पासपोर्ट’ आणि ‘हेल्थ पास’


न्यूयॉर्क: सध्या विविध देशांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष लसीकरण किंवा लसीकरणाचे नियोजन सुरू झाले असल्याने वर्षभरात कोरोनाची दहशत संपुष्टात येण्याची आशा बाळगली जाऊ लागली आहे. मात्र, या काळातील ‘न्यू नॉर्मल’मध्ये मोबाईल ऍप्लिकेशनवर आधारीत व्हॅक्सिन पासपोर्ट आणि कोरोना निगेटिव्ह असल्याचे डिजीटल पुरावे अनिवार्य असू शकतात. यासाठी काही देशांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे प्रस्ताव दिले आहेत. हे उपाय नाकारले नसले तरीही एकदा संसर्गमुक्त झालेल्यालाही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने हे निर्बंध तकलादू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

सध्याच्या काळात शारीरिक अंतर, मास्क हे जसे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे आगामी काळात पुन्हा कोरोनाचा सार्वत्रिक संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने आपण कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा आणि आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा डिजिटल पुरावा बाळगणे अनिवार्य असणार आहे. असा पुरावा नसल्यास सभागृह, चित्रपटगृह, रेस्तरॉंज, स्टेडीयम, मॉल्स अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जाऊ शकतो. कदाचित विदेशात जाण्यासाठीही हे पुरावे सक्तीचे केले जाऊ शकतात.

चाचण्या आणि लसीकरणाचे तपशील नोंदविणारी मोबाईल ऍप्लिकेशन्स काही कंपन्यांनी विकसित केली आहेत. त्यामध्ये कोरोना चाचण्या आणि लसींचा तपशील ऍपधारकाने अपलोड करणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी विचारणा करण्यात येईल त्या ठिकाणी तो दाखविणे गरजेचे असेल. कॉमन ट्रस्ट नेटवर्कद्वारे तयार केलेले ‘कॉमन पास’ ऍप अशा सुविधेचे एक उदाहरण आहे. या द्वारे आपला कोरोना स्थितिदर्शक पास QR कोडच्या स्वरूपात तयार केला जातो. त्याद्वारे अधिकारी त्यावरील माहिती पाहू शकतात. कॉमन ट्रस्ट नेटवर्क हे द कॉमन प्रोजेक्ट आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आले असून या संघटनांनी कॅथे पॅसिफिक, जेट ब्ल्यू, लुफ्थांसा, स्विस एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि व्हर्जिन अटलांटिक अशा हवाई प्रवासी वाहतूक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ‘आयबीएम’नेही याच धर्तीवर ‘डिजिटल हेल्थ पास’ नावाचे ऍप विकसित केले असून त्याद्वारे लसीकरण आणि कोरोना चाचणी अहवालांसह कंपन्या कर्मचारी आणि अभ्यागतांना प्रवेश देताना त्यांच्या शरीराचे तापमानही पाहू शकतात.