
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे अन्यथा जी परिस्थिती सध्या उद्भवली आहे ती कायम राहिली तर ते देशासाठी चांगले नसेल, असा इशारा दिला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या सद्य परिस्थितीवर शरद पवारांनी केले भाष्य
त्याचबरोबर मला वाटते सरकारने संपूर्ण आंदोलन अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवे. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. तसेच मी असेही ऐकले आहे की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगले नसल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी टीका केली आहे. तोमर यांनी म्हटले की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत. मात्र, आता या सुधारणा घडून येऊ पाहत आहेत तर शरद पवार त्याला विरोध करत आहेत.
