नव्या कृषि कायद्यांबाबत कुमारस्वामींनी ओढली राजनाथ सिंह यांची री


बंगळुरू: नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी केंद्र तातडीने पावले उचलण्याचे आवाहन करतानाच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (एस) नेते कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांनी हे कायदे एक वर्षासाठी लागू होऊ द्यावेत असेही आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना हेच आवाहन केले होते.

दिल्लीच्या सीमांवर तब्बल महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की आहे. देशाची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी सरकारने संप मिटविण्याचा दृष्टीने त्वरित पावले उचलावी आणि शेतकऱ्यांनीही एक वर्षासाठी हे कायदे लागू करू द्यावे, असे कुमारस्वामी यांनी सुचविले आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या ७ फेऱ्या झाल्या असून त्या सर्व निष्फळ ठरल्या आहेत. सरकारने दिलेला चर्चेचा नवा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी स्वीकारला असून सोमवारी दु. ११ वाजता चर्चेला तयार असल्याचे सरकारला कळविले आहे. मात्र, तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, किमान हमी भावाला कायदेशीर स्वरूप द्यावे आणि सुधारित वीज विधेयकावर चर्चा करावी, अशा शेतकरी संघटनांच्या अटी आहेत.