मुंबई : राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या व नाताळ, नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांसमोर नववर्षाचे स्वागत तर तळीरामांसमोर थर्टीफर्स्ट कसा साजरा करणार असा प्रश्न उभा राहिला होता. यावर राज्य सरकारने गाईडलाईन जारी केली आहे.
राज्य सरकारकडून कोरोनाच्या व नाताळ, नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन जारी
राज्य सरकारने संचारबंदी ३१ डिसेंबरला शिथिल करावी, नाहीतर मनसे तेव्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेने दिला होता. तसेच हॉटेल व्यावसायिकही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर आज जारी केलेली गाईडलाईन महत्वाची मानली जात आहे.
अशी आहे नियमावली
कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर, २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत:
- कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी, २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पड़ता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
- ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
- कोरोना च्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक /सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
- आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. ७. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य. पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
- तसेच या परिपत्रकानंतर ३१ डिसेंबर, २०२० व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.