काश्मीरमध्ये एनजीओच्या नावाखाली तुर्क संघटनांचा भारतविरोधी प्रचार


नवी दिल्ली: काश्मीरमध्ये विशेषतः कलम ३७० रद्द झाल्यापासून तुर्कस्तानातील संघटनांनी धार्मिक आणि सेवाभावी संस्थांच्या नावाखाली हात-पाय पसरले असून त्या दानधर्म आणि सेवाभावी कार्याच्या बुरख्याआड स्थानिकांना भारताविरोधात भडकवण्याचे कार्य करीत असल्याचे वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

तुर्कस्तानातील एक मोठी सेवाभावी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. तिचे जगातील अनेक देशांमध्ये जाळे पसरले आहे. ही संस्था काश्मीरमध्येही कार्यरत झाली असून रमझानच्या काळात तिने अन्नदान आणि रोख रक्कम वाटण्याचे काम ‘जकात’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर केले. मात्र, त्याचवेळी या संस्थेकडून भारतविरोधी प्रचार करून जनमत भडकवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. या संस्थेकडून खोऱ्यातील फुटीर संघटना आणि नेत्यांना पाठबळ मिळाल्याची माहिती सूत्रांनी वृत्तवाहिनीला दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

तुर्कस्तानचे भारतविरोधी अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगान यांचा धार्मिक आणि भूराजकीय अजेंडा राबविण्याचे काम करणाऱ्या ‘दियानेट’ या धार्मिक संचालनालयाचा या सेवाभावी संस्थेला पाठींबा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक करतातकलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर या संस्थेच्या काश्मीरमधील कारवायांना वेग आला असून अनेक स्थानिक संस्था संघटनांनाही त्यांनी पाठबळ पुरविले आहे.

या संस्थेखेरीज हैदर फाउंडेशन ही देखील अशीच स्वयंसेवी संस्था असून त्यांच्यामार्फत अनेक सेवाभावी कामे केली जातात. मात्र, त्यांच्याकडून स्थानिकांमध्ये धर्माच्या नावावर भारतविरोधी राजकीय प्रचारही केला जातो, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या महत्वाच्या संस्थांसह अनेक छोट्या छोट्या संस्था जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. भारतात येऊन भारतविरोधी कारवाया करण्याबरोबरच तुर्कस्तान किंवा जगात अन्यत्र शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतविरोधी प्रचार करण्यात येत आहे. त्यामध्ये ‘टर्कस ऍब्रॉड अँड रिलेटेड कम्युनिटीज’ आणि ‘टर्की यूथ फाउंडेशन’ या संस्था आघाडीवर असून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना तुर्कस्तानात शिक्षण आणि शिष्यवृत्तीचे आमीष दाखविले जाते. या संस्थांना एर्दोगान आणि त्यांचा मुलगा बिलाल यांचा पाठींबा असल्याचे सांगितले जाते.