शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या


नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनात टिकरी सीमेजवळ पंजाबमधील एका वकिलाने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ ञासाठी आपण बलिदान देत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असेही चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले पंजाबमधील वकील अमरजीत सिंग हे टिकरी सीमेजवळ आंदोलनस्थळापासून काही अंतरावर पडलेले आढळले. त्यांना रोहटक येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीवरून त्यांनी विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

शेतकरी, शेतमजूर यांच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमध्ये केंद्र सरकारच्या ३ ‘काळ्या’ कायद्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे. शेतकऱ्यांनी या कायद्यांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आपण बलिदान देत आहोत, असे अमरजीत सिंग यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावं, असेही त्यांनी म्हटले आहे. या चिठ्ठीवर १८ डिसेंबर ही तारीख असून तिची सत्यता पडताळून पहिली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनातील ही तिसरी आत्महत्या आहे. यापूर्वी शीख संत रॅम सिंग यांनी, ‘शेतकऱ्यांच्या वेदना बघवत नाहीत,’ असे नमूद करीत स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर काही दिवसातच २२ वर्षीय तरुणानेही आंदोलनातून परत येऊन भटींडा येथे आत्महत्या केली आहे.