शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता कशी ओळखाल?


आपल्या शरीराला ताकद पुरविणारे ‘पावर हाउस’ कोणते असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर पोटॅशियम असेच असेल. आपल्या शरीरात पोटॅशियम शरीरातील कोशिकांमध्ये असून, हे आपल्या नर्व्हज आणि स्नायूंना क्रियाशील ठेवण्यास मदत करते. तसेच इतर पौष्टिक तत्वे अवशोषित होण्यासाठी, किडनीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित ठेवण्यासही पोटॅशियम सहायक आहे. आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करून आपण पोटॅशियम प्राप्त करू शकतो. पण वास्तविक बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन शारीरिक गरजेच्या अर्ध्या मात्रेमध्येच पोटॅशियम त्यांना मिळत असते. जर शरीराला पोटॅशियम कमी मात्रेमध्ये मिळत असले, तर त्यामुळे बद्धकोष्ठ, स्नायूंमध्ये अशक्तपणा, शारीरिक थकवा अशी लक्षणे जाणवू लागतात.

जसजशी पोटॅशियमची कमतरता वाढू लागेल, तसतशी ही लक्षणे देखील जास्त जाणवू लागतात. जर ही लक्षणे प्रमाणाबाहेर वाढली, तर त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. ज्या व्यक्ती लॅक्झेटीव्हज किंवा डाययुरेटिक औषधांचा अतिवापर करतात, त्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होऊ शकते. तसेच ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नसेल, किंवा ज्यांना वारंवार डायरियाचा त्रास होत असेल, त्यांच्याही शरीरामध्ये ही कमतरता उद्भवते. त्याचबरोबर अतिशय उष्ण हवामानामध्ये सतत शारीरिक श्रम केल्यानेही ही कमतरता उद्भवते. पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे जाणविल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदयाचे ठोके अनियमित असणे, रक्तदाब प्रमाणाबाहेर जास्त वाढणे, किडनी स्टोन्सचा त्रास उद्भवणे, सतत शारीरिक थकवा जाणविणे, कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करीत असताना स्नायूंमध्ये ‘क्रॅम्पस्’ येणे, ही सर्व लक्षणे देखील पोटॅशियमच्या कमतरतेची सूचक असू शकतात. ही कमतरता आहारामध्ये ताज्या भाज्या, फळांचा समावेश करून दूर करता येतेच, पण गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंटस् घेऊनही पोटॅशियमची कमतरता दूर करता येते. मात्र यासाठी औषधोपचार स्वतःच्या मनाने न करता केवळ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment