नवा कोरोना: ‘उपचारपद्धतीत बदलाची गरज नसल्याची टास्क फोर्सची सूचना


नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या उत्परिवर्तित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केल्या जात असलेल्या उपचारांच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे महासाथीच्या काळात केंद्राने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने सूचित केले आहे.

नव्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सच्या बैठकीचे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने आयोजन करण्यात आले. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल आणि आयसीएमआरचे सचिव डॉ. बलराम भार्गव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. नव्या विषाणूची ओळख, चाचणी आणि उपचार याबाबत सध्या पद्धतीत काही बदल करण्याच्या आवश्यकतेबाबत बैठकीत चर्चा झाली.

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या विषाणूची संक्रमणशीलता अधिक वेगवान असल्याने भारतात त्याचा प्रसार रोखण्यासाठी या नव्या विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांची ओळख पटविणे आणि त्यांना विलग ठेवणे यावर या चर्चेमध्ये भर देण्यात आला. नव्या स्वरूपातील विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपचाराची सध्याची उपचारपद्धती बदलण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष या चर्चेतून काढण्यात आला.

आयसीएमआरने चाचणीसाठी नेहेमीच दोन किंवा अधिक जनुकांचा वापर करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या चाचण्यांच्या पद्धतीतही नव्या विषाणूचे संक्रमण ओळखण्यात फारशी अडचण येणार नाही, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला. नव्या विषाणूचा लवकर शोध आणि नियंत्रणासाठी अन्य साथरोगांच्या विषाणूंप्रमाणे या विषाणूमध्येही सातत्याने उत्परिवर्तन (बदल) होण्याची शक्यता काटेकोरपणे ध्यानात घेणे आवश्यक आहे, असे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

नव्या विषाणूला दूर ठेवण्यासाठीही शारीरिक अंतर, हातांची वारंवार स्वच्छता, मास्क घालणे या उपाययोजना आवश्यक आहेत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.