व्यायाम हा सुदृढ शरीराकरिता आवश्यक आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आपले शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा, आपल्या आवडीचा व्यायामप्रकार निवडून त्यानुसार शारीरिक कसरत करीत असतो. पण अनेक गृहिणींना मात्र घरच्या कामाच्या आणि पारिवारिक जबाबदाऱ्यांच्या व्यापातून व्यायामासाठी आवर्जून वेळ काढणे शक्य होतेच असे नाही. पण ह्याचा अर्थ ह्या महिलांना व्यायाम मिळतच नाही असा अजिबात नाही. किंबहुना घरातील अनेक कामे करीत असताना देखील आपल्या कॅलरीज खर्च होत असतात. घरामध्ये कित्येक कामे अशी आहेत, जी करीत असताना शरीराला भरपूर व्यायाम मिळत असतो. ही कामे साधारण एक तासाच्या अवधी करिता केली गेली, तर त्या एक तासामध्ये शंभराहूनही अधिक कॅलरीज खर्च होत असतात. आणि केवळ महिलाच का, तर घरातील प्रत्येक व्यक्ती ही कामे करून कॅलरीज घटवू शकतील.
स्वयंपाकघरातील खरकटी भांडी घासण्याचा अनेकांना मनापासून कंटाळा असतो. पण जर सलग एक तास भांडी घासली, तर तुमच्या शरीरातील तब्बल १८०-१९० कॅलरीज या कामी खर्च होतात. त्यामुळे पुढच्या वेळी भांडी घासण्यासाठी किती वेळ लागला हे पाहून एका तासाच्या हिशोबाने किती कॅलरीज खर्च झाल्या असतील ह्याचा अंदाज आपण नक्कीच घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हाताने कपडे धुण्यातही १५० कॅलरीज खर्च होतात. पण आजकाल वेळेच्या अभावी, आणि वॉशिंग मशीनची सोय बहुतेक घरांमध्ये उपलब्ध असल्याने, हाताने कपडे फारसे धुतले जात नाहीत.
घराचा केर काढून फरशी पुसणे हे काम मेहनतीचे आहे. त्यातून केर काढताना घरातील वस्तू उचलून, किंवा जड वस्तू जागच्या हलवून केर-फरशी करण्यात आणखीनच मेहनतीची आवश्यकता असते. शिवाय हे काम करताना उभ्याने किंवा ओणवे बसून केले जाते. त्यामुळे हे काम एक तासाच्या अवधीसाठी केले गेले तर त्यामध्ये तब्बल २४५ ते ३७० कॅलरीज खर्च होत असतात.
ही दैनंदिन कामे केल्याने खर्च होऊ शकतात शंभराहूनही अधिक कॅलरीज
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही