डार्क चॉकलेट खा आणि वजन घटवा


चॉकलेट खाण्यास आवडत नाही, असा मनुष्य विरळाच असेल. गोड, तोंडामध्ये सहज विरघळणारे चॉकलेट कुठल्याही वेळी हवेहवेसेच वाटते. पण चॉकलेटच्या अतिसेवानाचे दुष्परिणाम लठ्ठपणाच्या रूपामध्ये समोर येऊ लागतात. पण एक चॉकलेट असे ही आहे, जे (प्रमाणात) खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची चिंता करावी लागत नाही. किंबहुना हे चॉकलेट खाल्ल्याने वजन घटण्यास मदत होते. हे चॉकलेट म्हणजे आपण नेहमी खातो ते मिल्क चॉकलेट नाही, तर डार्क चॉकलेट आहे.

डार्क चॉकलेटच्या सेवनाने वारंवार भूक लागणे कमी होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतरही मधल्या वेळेला भूक लागल्यास डार्क चॉकलेटच्या लहान तुकड्याचे सेवन करावे. डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लावेनॉईडस् रक्तातील साखर कमी करण्यास सहायक असतात. तसेच ह्यांच्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण गोड पदार्थांचे अत्यधिक सेवन करतो, तेव्हा आपले शरीर इंस्युलीन प्रतिरोधक होऊ लागते. ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये घ्रेलीन नामक हार्मोन सक्रीय होतो. ह्या हार्मोनच्या प्रभावामुळे भूक वाढते, आणि परिणामी आपला आहारही वाढू लागतो व वजनही वाढू लागते. मात्र डार्क चॉकलेटच्या सेवनाने शरीरामध्ये इंस्युलीन प्रतिरोधक तत्वे तयार न होता घ्रेलीन हा हार्मोनही संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार काही ना काही खाण्याची इच्छाही नियंत्रणात राहते.

जर शारीरिक किंवा मानसिक तणाव प्रमाणाबाहेर वाढला, तर त्यामुळे शरीरातील कॉर्टीसोल नामक तत्वात वाढ होऊन त्यामुळे भूकही वाढू लागते. त्यामुळेच मानसिक ताण अनुभविणाऱ्या व्यक्ती जास्त खाताना आढळतात. अश्या वेळी डार्क चॉकलेट दररोज थोडे खाल्ल्याने शरीरातील सरोटोनीन आणि एंडोर्फिनच्या पातळी वाढतात, आणि त्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या मॅग्नेशियम मुळे शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment