थंडीच्या लाटेमध्ये मद्यपान करू नका: हवामानशास्त्र विभागाची सूचना


नवी दिल्ली: उत्तर भारतामध्ये दि. २९ पासून थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हमानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मद्यपान करणे टाळावे आणि शक्यतो घरात अथवा बंदिस्त जागेतच रहावे, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत.

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि राजस्थानच्या उत्तरेकडील भागात दि. २९ पासून थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर विभागाने मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांना मद्यपान न करण्याची सूचना देण्यात आली आहे. मद्यपानामुळे शरीराचे तापमान कमी होत असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे विभागाने नमूद केले आहे.

हिमालयाच्या पर्वतरांगांनवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पश्चिमेकडे अडथळा निर्माण झाल्याने रविवार आणि सोमवारी पारा काहीसा वर येऊ शकतो. मात्र, हा अडथळा अल्पकालीन आहे. त्यामुळे त्यानंतर हिमालयाकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तरेत थंडीची लाट येऊ शकते, असे विभागीय केंद्राचे प्रमुख किलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.