‘मेनोपॉझ’ची लक्षणे अनुभविणाऱ्या महिलांची अशी असावी आहारपद्धती


मेनोपॉझचा काळ हा महिलांच्या आयुष्यातील काहीसा अवघड काळ म्हणायला हवा. साधारण चाळीस ते पंचेचाळीस या वयामध्ये महिलांची मासिक पाळी बंद होते. पाळी बंद होण्याची ही प्रक्रिया साधारण दोन ते तीन वर्षे सुरु राहते. या काळामध्ये महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येत असतात. तसेच रात्रीच्या वेळी अचानक घाम फुटणे, मनस्थितीमध्ये अचानक येणारे बदल, थकवा, ही मेनोपॉझची लक्षणे आहेत. ह्या काळामध्ये महिलांचे वजन वाढू लागते तसेच हाडे कमकुवत होऊ लागतात. ही लक्षणे सर्वच महिलांमध्ये एकसारखीच असतील असे नाही, पण सर्वसाधारणपणे ही लक्षणे बहुतेक महिलांना कमी जास्त प्रमाणामध्ये जाणवित असतात. ही लक्षणे संपूर्णपणे टाळता येणे शक्य नसले, तरी योग्य संतुलित आहार आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल केल्याने या लक्षणांचा प्रभाव कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, आणि या अवघड काळामध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सहज सामोरे जाता येते.

तज्ञांच्या मते या काळामध्ये महिलांनी लोह, कॅल्शियम आणि फायबर मुबलक मात्रेमध्ये असणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे. तसेच चरबीयुक्त पदार्थ, साखर युक्त पदार्थ आणि मिठाचे प्रमाण आहारामध्ये कमी करावे. हे बदल केल्याने वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते. ज्या महिलांचे वजन जास्त असेल, त्यांनी आपल्या आहाराप्रमाणे आपल्या जीवनशैलीमध्येही बदल करून, वजन घटविण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये व्यायामासाठीही वेळ द्यायला हवा.

मेनोपॉझच्या काळामध्ये महिलांची मनस्थिती क्षणा-क्षणाला बदलत असते. एका क्षणी अगदी आनंदात असणारी महिला, पुढच्याक्षणी उदास होते. सतत बदलणाऱ्या या मनस्थितीला ‘मूड स्विंगस्’ म्हटले जाते. असे हे मूड स्विंगस् साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनाने आणखीनच वाढतात. गोड पदार्थांच्या सेवनाने ब्लड शुगरची पातळी झपाट्याने वाढते. आणि एकदा ही पातळी कमी झाली, की पुन्हा शारीरिक थकवा जाणवू लागतो. अश्या प्रकारे शुगर लेव्हल्स झपाट्याने खाली-वर होऊ नयेत याकरिता सातत्याने रक्तामध्ये शुगर ‘रिलीज’ करणाऱ्या कॉप्लेक्स कर्बोदकांचे सेवन करणे आवश्यक असते. आहारतज्ञांच्या मते यासाठी ज्वारी, बाजरी, यांसारखे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करून मैदा आणि भात यांचे सेवन कमी करायला हवे.

तसेच आहारामध्ये मटार, हिरव्या शेंगभाज्यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, नाचणी, आणि ताजी फळे यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळत असल्याने यांचाही समावेश आहारामध्ये असावा. या काळामध्ये तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन कमी असावे. तसेच प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड पदार्थांचे सेवनही कमी असावे. या काळामध्ये इस्ट्रोजेन नामक हार्मोन जास्त सक्रिय नसल्याने शरीराची चयापचय शक्ती कमी होते. त्यामुळे वजन वाढू लागते. हे टाळण्यासाठी तज्ञांच्या मते मेनोपॉझ अनुभवीत असलेल्या महिलांच्या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण आधीच्या आहाराच्या मानाने ४०% कमी असावे. त्याऐवजी डाळी, कडधान्ये, मोडविलेली कडधान्ये, अंडी, पनीर, टोफू, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचे प्रमाण जास्त असावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment