भोजन बनविण्याची आयुर्वेदिक पद्धती भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. ह्या खाद्यपरंपरेचे ज्ञान सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये अगदी नियमित उपयोगामध्ये आणले जात असते. ह्या खाद्य परंपरेनुसार आपण खातो ते अन्न शीतल (थंड) प्रकृतीचे असते, किंवा उष्ण प्रकृतीचे असते. उष्ण प्रकृतीच्या पदार्थांमुळे पित्तामध्ये वृद्धी होते, तर शीतल प्रकृतीच्या पदार्थांमुळे वात किंवा कफाची वृद्धी होत असते.
ह्या व्यतिरिक्त काही पदार्थ असे असतात, ज्यांच्या सेवनामुळे शरीराच्या पित्त, कफ आणि वात ह्या त्रिदोष उर्जांमध्ये संतुलन निर्माण होत असते. ह्या पदार्थांच्या सेवनाने शरीराचे आरोग्य उत्तम राहून रोगराई शरीरापासून दूर राहते. तर काही पदार्थ असे असतात, जे पचण्यास कठीण असून, त्यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे आपले शरीर सहज पचवू शकेल अश्या पदार्थांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारी असते.
विशेषतः एखादी व्यक्ती आजारी असताना किंवा आजारपणातून उठल्यावर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये खूप थकवा आणि अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे अश्या वेळी संतुलित आहाराची आजारी व्यक्तीला जास्त आवश्यकता असते. तसेच ह्या काळामध्ये शरीराला पचण्यासाठी जड पदार्थांचे सेवन टाळावे. असे पदार्थ बनविताना, ते पचण्यास सोपे व्हावेत ह्याकरिता पचनास सहायक अश्या विशेष मसाल्यांचा वापर अवश्य करावयास हवा. तसेच ह्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवनही टाळायला हवे.
शरीरातील तीनही दोषांना संतुलित ठेवणारे भोजन प्रत्येकासाठी लाभकारी ठरते. अश्या भोजनाने शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन असल्यास ते ही ठीक होते. पदार्थांच्या प्रमाणे व्यक्तींच्या प्रकृती देखील शीतल किंवा उष्ण असतात. शीतल प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कफ किंवा वाताशी संबंधित समस्या उद्भवतात, तर उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पित्ताशी निगडित समस्या अधिक उद्भवितात. त्यामुळे पदार्थ आणि शरीराच्या प्रकृती लक्षात घेऊनच आपला आहार निवडावा.
भोज्य पदार्थांची प्रकृती पाहूनच त्यांचे करावे सेवन
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही