कृषी कायद्यांवर खुल्या चर्चेसाठी पुढे या: राहुल गांधी यांना आव्हान


नवी दिल्ली: कृषी कायद्यांवर टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कायद्यांबाबत समोरासमोर खुल्या चर्चेसाठी पुढे यावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. विरोधकांकडून दिशाभूल झालेले काही शेतकरी राजधानीत आंदोलन करीत आहेत आणि विरोधक हे आंदोलन देशभरातील शेतकऱ्यांचे असल्याचे चित्र निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. चेन्नईनजीक तामिळनाडू भाजपने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

काँग्रेसच्या काळात पंजाबमधील शेतकऱ्यांना जेवढा किमान हमी भाव मिळाला, त्याच्या दुप्पट भाव राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या काळात मिळाला आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न आताच दुप्पट झाले आहे. तरीही ते आंदोलन करीत आहेत कारण विरोधी पक्षांनी त्यांची दिशाभूल केली आहे, अशी टीका जावडेकर यांनी केली.

दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे राजकीय पुढारी यांनी हे आंदोलन देशव्यापी असल्याची हवा निर्माण केल्याने या आंदोलनाची देशभर चर्चा होत आहे. मात्र, नवे कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’सारख्या उपक्रमांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने देशभरातील शेतकरी समाधानी असल्याचा दावा जावडेकर यांनी केला. किमान हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे अस्तित्व नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतरही कायम राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.