वर्षभरात कोल्हापूरला परतणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचा टोला


पुणे – आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात वक्तव्य केले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन टोला लगावला आहे. चार रुग्णवाहिकांचे पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सरकार नसल्यामुळे ते अस्वस्थ झाले असून देवेंद्र फडणवीस सुरुवातीला पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवले नव्हते. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाल्याचे अजित पवारांनी म्हटले. निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच ते परत जाण्याची भाषा करु लागले. पाच वर्षासाठी लोकांनी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. उद्या लोक कामे घेऊन गेले, तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होते, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांचे काम त्यांनी करावे आणि आम्ही आमचे करतो. शेतकऱ्यांच्या बाजूने जर यांनी निर्णय घेतले आहेत, तर तो रस्त्यावर का आला आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचे आत्मपरीक्षण करावे. येथे बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

मी कधीही भाजपचे आमदार माझ्या संपर्कात असल्याचे म्हटलेले नाही. काळजी घ्या, मागच्या वेळी तुम्ही फोडाफोडी केली आणि सरकार येणार नाही, आपली कामे होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथे कामे होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढेच म्हटले. काही गोष्टी तीन चार महिन्यात घडू शकतात, असे म्हटले तर त्यांना राग आला. इतर पक्षातील आमदार घेताना त्यांना उकळ्या फुटत होत्या, बरे वाटत होते. पण आता कसे वाटते तर गार गार वाटू लागल्याचा चिमटा त्यांनी काढला.