अब्दुल सत्तार यांना आम्ही आयुष्यभर टोप्या पुरवू- गिरीश महाजन


मुंबई – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याचा भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आयुष्यभर अब्दुल सत्तार यांनी टोपी लावूनच ठेवावी, त्यांना आम्ही टोप्या पुरवू, असा टोला गिरीश महाजन यांनी सत्तार यांना लगावला आहे.

गिरीश महाजन एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, युतीतून अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे. रावसाहेब दानवे यांची कामे मोठी आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठी कामे केली आहे. त्यांना पराभूत करणे तेवढे सोप नसल्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवे तर त्यांना आम्ही टोप्या पुरवू, असा टोला महाजनांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपचे नेते खासगीत कौतुक करतात, या सत्तार यांच्या वक्तव्याचाही महाजन यांनी समाचार घेतला. असे काहीही भाजपचे लोक म्हणत नाहीत. कोणत्याही भाजप नेत्याने असे कधीच म्हटले नाही. सत्तारांची बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याचे महाजन म्हणाले. तसेच, भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम बगल में छुरी, या सत्तारांच्या वक्तव्यावर महाजन म्हणाले की, राम मंदिराचा विषय आता जुना झाला आहे. आता तर निवडणुकाही नसल्यामुळे राम मंदिरावर बोलण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्याविषयी बोला, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी केली.