पुणे: मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन सुरू असतानाच, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मांजरीत शेतकरी संवाद मेळावा झाला. फडणवीस यांनी या मेळाव्यात ठाकरे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या बांधावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाजावाजा करत गेले होते. त्यावेळी मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. कमी पैसे काय देता असे म्हणत, ५० हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे, असे ते म्हणाले. २५ हजार रुपये हेक्टरी कोरडवाहू जमिनीसाठी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. आमचे अजितदादा तर त्यात त्याहीपेक्षा वर निघाले. उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता, बागायतदारांना तर दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. आम्हाला तर ते शेतकऱ्यांचे कैवारी वाटले. पण कसले ५० हजार, २५ हजार आणि दीड लाख, राजा उदार झाला नाही, तर उधार झाला, हाती भोपळा आला अशी परिस्थिती सध्याच्या सरकारमध्ये दिसते, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मग अन्य बाबींसाठी राज्याच्या तिजोरीत पैसा कसा?
मांजरी बुद्रुक येथे पत्रकारांशी साधलेला संवाद…https://t.co/ve6UzNu4Vw pic.twitter.com/UIlzMntAHk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 25, 2020
सहा-आठ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले होते, तेही मिळाले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत साखरेच्या अर्थकारणामध्ये जे निर्णय झाले, ते याआधी कधीही झाले नाहीत. ते मोदी सरकारने करून दाखवले. आज या सरकारच्या काळात अतिवृष्टी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्याला मिळत नाही. प्रधानमंत्री पिक विमा योजना आम्ही आणली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यातून कोट्यवधी रुपये मिळाले. आता शेतकऱ्यांवर संकट कोसळले तर, एक नवा पैसाही विम्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाला नाही. आम्ही चार वर्षे चांगल्या प्रकारे ही विमा योजना लागू केली होती. ही विमा योजनाच या सरकारने एकप्रकारे बासनात गुंडाळून ठेवल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही आताच्या सरकारमध्ये नाही. शेतकऱ्यांना आम्ही पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आले त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलो. आज काही झाले तरी त्यांच्याकडे ढुंकूणही पाहिले जात नाही. शेतकऱ्याचा विचारही केला जात नाही. अशी परिस्थिती सध्याच्या सरकारमध्ये पाहायला मिळत असल्याचे म्हणत याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.