… तर सरसंघचालकांनाही म्हणतील अतिरेकी: राहुल गांधी


नवी दिल्ली: देशात सध्या लोकशाही अस्तित्वात नाही. पंतप्रधानांना विरोध करण्याऱ्या प्रत्येकाला अतिरेकी ठरविण्यात येते. उद्या सरसंघचालक मोहन भागवत यांनी जरी पंतप्रधानांच्या विरोधी भूमिका घेतली तर त्यांनाही अतिरेकी ठरविले जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार मोर्चाने विजय चौकातून राष्ट्रपती भवन येथे निघाले होते. काँग्रेसचे शिष्टमंडळ शेतकरी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे २ कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करणार होते. मात्र, त्यापूर्वीच राहुल व प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली.

भारतात लोकशाही शिल्लक नाही. जे काही आहे तो लोकशाहीचा आभास आहे. पंतप्रधान केवळ मूठभर भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात मग्न आहेत. त्यांना जो कोणी विरोध करेल, त्याला अतिरेकी ठरविले जात आहे. मग ते शेतकरी, कष्टकरी असतील किंवा अगदी मोहन भागवत असले तरीही त्यांना अतिरेकी ठरविले जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.