ब्रिटनमध्ये कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारामुळे दहशत


लंडन : संपूर्ण जगावर कोरोनामुळे ओढावलेले संकट आता आणखी तीव्र रुप घेताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या आघातातून जग सावरलेले नसतानाच तोच कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटनने काही दिवसांपूर्वी साऱ्या जगाला सजग केले. ज्यानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाच्या आणखी एका प्रकारामुळे आता हाहाकार माजल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण आफ्रिकेहून परतलेल्या दोन व्यक्तींमार्फत व्हायरसचा हा प्रकार ब्रिटनमध्ये पोहोचल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी यासंदर्भातील माहिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी दिली. अधिक वेगाने संसर्ग या व्हायरसचा नवा प्रकार पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागाने मागील आठवड्यात येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

सध्याच्या घडीला ब्रिटनमध्ये दोन नव्या प्रकारच्या कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. ज्या पार्श्वभूमीवर हँकॉक 10 डाऊनिंग स्ट्रीटला संबोधित करतेवेळी म्हणाले, अशा व्यक्तींमध्ये कोरोनाचे हे दोन्ही नवे प्रकार आढळून आले आहेत, जे मागील काही दिवसांत दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवणारे असून, त्यामुळे झपाट्याने संसर्ग वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ब्रिटनवर असणाऱ्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेमघ्ये जे आहेत किंवा दक्षिण आफ्रिकेतील कोणाच्याही संपर्कात मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत आले आहेत, त्यांनी विलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमध्ये भीतीचे वातावररण असतानाच सावधगिरीचे पाऊल म्हणून भारत आणि युरोपातील अनेक राष्ट्रांनी ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. तर लॉकडाऊनचे नियम ब्रिटनमध्येही अधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तिथे कोरोनाच्या असिम्प्टमॅटीक म्हणजेच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी सेल्फ टेस्टचा पर्याय अवलंबात आणण्यास सुरुवात केली आहे.

सध्या मोठ्या स्तरावर कोरोना चाचण्या ब्रिटनमध्ये करण्यात येत आहेत. त्याचबरोबर तेथे लक्षणे नसणाऱ्यांची चाचण्या करण्याचे सुरु करण्यात आले आहे, जेणेकरुन कोरोनातवर शक्य तितक्या वेगाने नियंत्रण मिळवता येऊ शकते. कोरोनामुळे संपूर्ण जगात संकट आलेले असताना लसीकरणाच्या बाबतीतही काही राष्ट्रांमध्ये वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लसीकरणासाठी भारतातही शासनाने हालचाली सुरु केल्या असल्यामुळे शक्य त्या सर्वपरींनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु असल्याचे म्हणावे लागेल.