युकेमध्ये अडकले रिंकू राजगुरू, संतोष जुवेकर, प्रियंकासह आणखी काही सेलिब्रिटी


लंडन – कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे युकेमध्ये ओढावलेले संकट आणि त्या पार्श्वभूमीवर तेथे लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे भारतातील अनेक मोठे सेलिब्रिटी तिथे अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आफताब शिवदासानी यांच्यासह ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकल्याचे वृत्त समोर येत आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने साऱ्या जगाला माहिती दिली. यामुळे युकेमध्ये दहशतीचे वातावरण असतानाच आता कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार समोर आल्यामुळे या दहशतीत भर पडली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे तेथे सक्तीचे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे अनेक भारतीय सेलिब्रिटी इंग्लंडमध्ये अडकले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातही काही महिन्यांपूर्वी सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. कलाविश्वातील सर्व कामकाज ज्यावेळी पूर्णपणे ठप्प होते. पण, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. पुन्हा चित्रीकरणांमध्ये अनेक कलाकार व्यस्त झाले. ज्यामध्ये प्रियंका चोप्रा, आफताब आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनच्या या कचाट्यात सापडलेल्या सेलिब्रिटींसमवेत त्यांच्या चित्रपटातील क्रू मेंबर्सही असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ग्रेट ब्रिटनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे पालन अतिशय सक्तीने करण्यात येत असल्यामुळे कलाकारांना परतीचे मार्ग सापडेनासे झाले आहेत.