देशात अठरा टक्के मृत्यू वायू प्रदूषणामुळे: आर्थिक हानीही उल्लेखनीय


नवी दिल्ली: वायू प्रदूषणामुळे भारतात सन २०१९ मध्ये १७ लाख मृत्यू झाले. देशातील एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण १८ टक्के आहे. या काळात अकाली मृत्यू आणि वायू प्रदूषणामुळे येणाऱ्या विकृती यामुळे झालेली आर्थिक हानी जीडीपीच्या १.४ टक्के (सुमारे २ लाख ६० हजार कोटी) होती. ‘Health and economic impact of air pollution in the States of India: The Global Burden of Disease Study 2019’ या शास्त्रीय निबंधामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन सुधारित पद्धती आणि आकडेवारीचा वापर करून वायू प्रदूषणामुळे भारताच्या प्रत्येक राज्यात आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात होणार्‍या परिणामांचा आढावा घेण्यात आला आहे. या संशोधनात म्हटल्याप्रमाणे देशातील घरगुती वायू प्रदूषण कमी होत आहे. त्यामुळे १९९० ते २०१९ या कालावधीत मृत्यूच्या प्रमाणात ६४ टक्क्यांनी झाली आहे, तर या काळात बाह्य वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण ११५ टक्क्यांनी वाढले आहे.

वायू प्रदूषणामुळे होणारी वित्तहानी उत्तर व मध्य भारतातील राज्यांमध्ये अधिक आहे. उत्तर प्रदेश (जीडीपीच्या २.२%) आणि बिहारमध्ये (जीडीपीच्या २%) ही हानी सर्वाधिक आहे. आशाराज्यांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणांसाठी गुंतवणूक केल्यास भारताला फायदा होईल आणि २०२२४ पर्यंत अमेरिकेच्या ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न साकारण्याकडे वाटचाल करता येईल, असे या निबंधात नमूद करण्यात आले आहे.

वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४० टक्के फुफ्फुसांच्या आजारामुळे उर्वरित ६० टक्के मृत्यू हृदयरोग, मधुमेह आणि मुदतीपूर्वी जन्म या कारणांनी होतात. वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर व्यापक परिणाम होतो, असे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’चे महासंचालक बलराम भार्गव यांनी नमूद केले.