‘ताडी’ प्यायल्यामुळे होत नाही कोरोना; बसप नेत्याचा अजब दावा


लखनौ : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. त्यातच जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ दिवस-रात्र कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात व्यस्त आहे. देश-परदेशात कोरोनावर नेमका काय उपाय करावा? यावर संधोधन केले जात असतानाच उत्तर प्रदेशातील एका नेत्याने अजब दावा केला आहे. बसपाच्या नेत्याने सांगितलेल्या उपायामुळे सारेच थक्क झाले आहेत.

कोरोनावर एक रामबाण उपाय उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांनी सुचवला आहे. त्यांनी हा रामबाण उपाय एका कार्यक्रमात बोलताना सुचवला आहे. नदीच्या पाण्यापेक्षाही ताडी शुद्ध आहे. ताडीच्या उद्योगातूनच राजभर समाज आपल्या मुलांचे संगोपन करतो. प्राचीनकाळापासून ताडीचे झाड आहे. ताडी प्यायल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. ताडी पिण्यामुळे कोरोना होणार नाही.

बसपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भीम राजभर यांचे अभिनंदन करण्यासाठी बलियातील आमदार उमाशंकर सिंह यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी या कार्यक्रमात नदीच्या पाण्यापेक्षा ताडीत जास्त ताकद असल्याचे म्हटले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी ताडी कशी मदत करू शकते? याचे मात्र कोणतेही प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पुरावा राजभर यांना देता आलेला नाही.

यावर, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी जोरदार टीका केली आहे. काही लोक बाष्कळ बडबड करून राजभर समाजाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांपासून जनतेने सावध राहायला हवे. समाजतील अशा लोकांना बसपाने डोक्यावर बसवले असल्याचे म्हणत त्यांनी भीम राजभर आणि बसपावर तोंडसुख घेतले.