सिंह आणि वाघांबरोबरच देशातील बिबट्यांची संख्या वाढली


नवी दिल्ली: सिंह आणि वाघांबरोबरच देशातील बिबट्यांची संख्याही उल्लेखनीय प्रमाणात वाढली आहे. देशातील बिबट्यांची संख्या १२ हजार ८०० झाली असून सर्वाधिक वाढ मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झाली आहे.

केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘स्टेटस ऑफ लेपर्ड्स’ हा अहवाल प्रसिद्ध केला. वाघ, सिंह, बिबटे यांच्या संख्येत मागील काही काळात होत असलेली वाढ हा देशातील जैववैविध्य आणि वन्यजीव संवर्धनाचे प्रयत्न याचा परिणाम असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिबट्यांच्या संख्येत वाढ ही ‘गुड न्यूज’ असल्याचे ट्विट केले आहे. वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले असून यापुढेही अधिक सक्षमपणे आपले प्रयत्न सुरू ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

देशात यापूर्वी सन २०१४ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीनुसार बिबट्यांची संख्या ७ हजार ९१० एवढी होती. या वर्षी त्यात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बिबट्यांच्या संख्येत मध्यप्रदेश (३ हजार ४२१), कर्नाटक (१ हजार ७८०) आणि महाराष्ट्र (१ हजार ६९०) ही राज्य देशात आघाडीवर आहेत.