करोनाने व्यापले अवघे भूमंडळ

फोटो साभार हिंदुस्थान टाईम्स

जगभरात थैमान घातलेल्या करोनाच्या कचाट्यातून आत्तापर्यत अलिप्त राहिलेल्या अंटार्टीका खंडात ही करोनाने आता प्रवेश केला असून अवघे भूमंडळ करोनाने व्यापले आहे. अंटार्टीका मध्ये चिलेच्या सैन्य आणि संशोधन केंद्रात करोनाची एन्ट्री झाली आहे. चिलेच्या जनरल बर्नाडो ओ हिंगीस रिक्ल्मे बेसवर सोमवारी केल्या गेलेल्या करोना चाचणीत ३६ जणांना करोना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २७ नोव्हेंबर रोजी चिलेहून आलेल्या एका डिलीव्हरी मधून करोनाने येथे प्रवेश केला असावा असे सांगितले जात आहे. बेसवर १० ठेकेदार आणि २६ सैनिक करोना संक्रमित सापडले आहेत. हे ठेकेदार केंद्रावर देखभाल व्यवस्थापन करण्याचे काम करत होते. चिले सरकारने या बेसवरून गरज नसलेला स्टाफ परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या बेसवर ६० लोक राहू शकतात. त्यात वैज्ञानिकासह २४ ठेकेदारांचा समावेश आहे. अंटार्टीका मध्ये करोना पोहोचल्याने येथील ७० बेस अन्य जगाशी तुटले असून येथील सर्व काम ठप्प झाले असल्याचे समजते.

जगभरात करोना संक्रमितांची संख्या ८ कोटींवर गेली असून १७ लाख जणांचे मृत्यू झाले आहेत.