असा असेल राज्यातील नाईट कर्फ्यू? जाणून घ्या काय सुरु असणार, काय बंद?


राज्य सरकारने पुन्हा एकदा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला असून हा कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ६ असा सात तासांसाठी असणार आहे. हा कर्फ्यू काल मध्यरात्रीपासून लागू झाला असून तो पाच जानेवारीपर्यंत कायम राहिल. ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकार सापडला असून ज्यामुळे तेथील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात युरोपियन देश आणि मिडल इस्टमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. नाईट कर्फ्यू दरम्यान भाज्या आणि दूधासारख्या आवश्यक गोष्टींच्या पुरवठयावर कोणताही परिणाम होणार नाही. या वस्तुंचा पुरवठा आधीप्रमाणेच सुरु राहिल.

पाच पेक्षा जास्त लोकांना नाइट कर्फ्यू दरम्यान ११ ते ६ या वेळात एकत्र येता येणार नाही. रात्री ११ वाजता केमिस्ट व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद होतील. रात्री ११ नंतर अनावश्यक प्रवास करता येणार नाही. २२ डिसेंबर ११.५९ मिनिटांपासून ३१ डिसेंबर ११.५९ पर्यंत यूकेवरुन येणारी सर्व विमाने बंद राहतील. ऑफिसेस, टॅक्सी, कार आणि रिक्षा रात्रीच्यावेळी नियमानुसार सुरु राहतील. जगात एकीकडे लसीकरणाला सुरुवात झालेली असताना नव्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली आहे.