नाताळच्या दिवशी पंतप्रधान करणार शेतकऱ्यांशी ‘ऑनलाईन’ चर्चा


नवी दिल्ली: नाताळच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी ‘ऑनलाईन’ चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेद्वारे ८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी १८ हजार कोटी रुपये लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलक शेतकरी ठाण मांडून बसले असतानाच देशभरातील शेतकऱ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. त्यासाठी देशाच्या सर्व विभागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांना कायद्यांचे महत्व आणि त्यापासून शेतकऱ्यांचे होणारे फायदे समजावून देतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचे काय फायदे मिळत आहेत, शेतकरी सध्या कोणते पीक घेत आहेत, आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, याबाबत मोदी शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. या चर्चेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राची वस्तुस्थिती समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.