प्रियंका गांधी यांनी फोडली काँग्रेस पक्षातील कोंडी


नवी दिल्ली: प्रियंका गांधी वढेरा यांनी पक्षातील असंतुष्ट आणि सर्वोच्च नेतृत्व यांच्यात संवाद घडवून आणला आणि पक्षातील कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

काँग्रेसची अधोगती रोखण्यासाठी पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व मिळावे, अशी मागणी करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र दिले होते. त्यावरून पक्षातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतही उमटले.

पक्षाची परिस्थिती सुधारण्यासाठी पक्षात सुसंवाद आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन प्रियंका गांधी यांनी असंतुष्ट नेत्यांपैकी गुलाम नबी आझाद यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर त्यांची आझाद आणि आनंद शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेतली. पक्ष बळकट करण्यासाठी एकोपा आवश्यक असून त्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे यावर त्यांचे एकमत झाले.

त्यानंतर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना असंतुष्ट नेत्यांशी संवाद साधण्यासाठी विनंती केली. त्यांनी मान्यता दिल्यानंतर नाथ यांनी असंतुष्ट नेत्यांशी संपर्क साधला आणि चर्चेची तारीख निश्चित झाली, असे सूत्रांनी सांगितले.

त्यापूर्वी दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि तरुण गोगोई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॉंग्रेस कार्यकारी समितीची आभासी बैठक २७ नोव्हेंबर रोजी झाली. या बैठकीला असंतुष्ट नेतेही उपस्थित होते. या बैठकीत प्रियंका यांनी पक्षात एकजूट निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आणि संघटीतपणे भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभे करणे याला पर्याय नाही, असे त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना पटवून दिले.