मुंबईतील नाईट क्लबवर छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई – मुंबईमधील ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला असून या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश रैना मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या या क्लबमध्ये उपस्थित होता. सुरेश रैनासोबत बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसेच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई सहार पोलिसांकडून करण्यात आली. एएनआयशी बोलताना मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैना आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाशी नियमावलीचे न पालन केल्याने त्याचबरोबर वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान मुंबईत काल मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.