कमल हसनचा पक्ष मोफत देणार संगणक आणि इंटरनेट


कांचीपुरम: विख्यात अभिनेता कमल हसन यांनी स्थापन केलेला पक्ष मक्कल निधी मय्यम सत्तेवर आल्यास इंटरनेटला मूलभूत हक्क म्हणून जाहीर करणार असून प्रत्येक घरात संगणक आणि वेगवान इंटरनेटची सुविधा मोफत देणार आहे.

पुढील वर्षी तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कमल हसन यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये मोफत संगणक व इंटरनेट, गृहिणींना मासिक वेतन, हरीत तंत्रज्ञानाधारित उद्योग, कृषी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

सध्याच्या काळात इंटरनेट आणि संगणक या मूलभूत गरज बनल्या असून त्या मिळविणे हा मूलभूत हक्क मानला जाईल. राज्यातील प्रत्येक घरात संगणक आणि १०० एमबीपीएस असलेले इंटरनेट कनेक्शन मोफत देण्यात येणार आहे. ही मनुष्यबळ क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल, असा दावा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. या सुविधेमुळे विशेषतः ग्रामीण जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडून येतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

गृहिणी घरातील सर्व महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. मात्र, तिच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जात नाही. त्यासाठी गृहिणींना नोकरदाराचा दर्जा देऊन त्यांना मासिक वेतन सरकारकडून देण्यात येईल आणि नोकरदारांना मिळणारे अन्य फायदेही प्रदान करण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. विद्यमान सरकारकडून पोंगलच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबासाठी काही अनुदान देण्यात येते. मात्र, ती रक्कम सणासाठी अथवा घरातील कर्त्या पुरुषाकडून खर्च केली जाते. हा प्रकार टाळून गृहिणीला स्वतःसाठी अथवा अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी ‘तिचे वेतन’ थेट तिच्या हातात पडेल अशी सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. शिक्षण, रोजगार आणि उद्योग यांच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याची ग्वाहीही ‘एमएनएम’ने दिली आहे.

पर्यावरण रक्षण हा आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमातील विषय असेल. राज्यात हरीत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. प्रदूषणमुक्त उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.