‘ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता’


नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचे अस्तित्व जगातील अनेक देशात असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक काटेकोरपणे अंमलात आणण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

नवीन प्रकारचा कोरोना सध्या अस्तित्वात असलेल्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक प्रमाणात संसर्गजन्य असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. अद्याप भाष्य करणे अवघड असले तरीही सध्याच्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी विकसित करण्यात आलेली लस नव्या विषाणूला रोखण्यात कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका घेण्यास वाव असल्याचेही डॉ. स्वामिनाथन यांनी नमूद केले.

ब्रिटनमध्ये कोरोनाबद्दल पूर्ण संवेदनशीलता असल्याने आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्या ठिकाणी नव्या स्वरूपातील कोरोना विषाणूचे अस्तित्व वेळीच शोधण्यात यश आले आहे. तर, अनेक देशात तंत्रज्ञानाच्या अभावाने अथवा या महासाथीबद्दलच्या गांभीर्याच्या अभावाने हा विषाणू अस्तित्वात असूनही ते प्रत्यक्षात आढळून आले नसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक देशाने आपल्या क्षेत्रात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची तपासणी करून विषाणूच्या स्वरूपावर लक्ष ठेवावे, असे आवाहनही डॉ. स्वामिनाथन यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या भारताकडे विषाणूचे विश्लेषण करण्याची उत्तम क्षमता असून भारताने त्याबाबत पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

नव्या प्रकारच्या कोरोनाचे रुग्ण इटालीमध्येही आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही नव्या विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.