‘मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा राजहट्ट अन् बालहट्टासाठीच बदलली’


मुंबई – नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही यावेळी सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर भाजपच्या इतर नेत्यांनीही टीका केली. आता, ठाकरेंवर माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी गंभीर आरोप केला आहे. तसेच, हा निर्णय केवळ राजहट्ट आणि बालहट्टासाठी घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलविल्यानंतर 4 वर्षे उशीर या प्रकल्पाला होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले. कांजूरमार्गची जागा न्यायालयीन वादात असल्यामुळे ठाकरे सरकारच्या समितीनेच दिलेल्या अहवालातून स्पष्ट सांगण्यात आले आहे की, मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलविल्यास 4 वर्षांचा विलंब होईल. तरीही, केवळ बालहट्ट आणि राजहट्टासाठी हा प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कांजूरमार्गला हलविण्याचे आदेश दिले आहेत.