नव्या करोनाला घाबरून ४३ देशांनी तोडला ब्रिटनशी संपर्क

 

फोटो साभार सीबीसी

ब्रिटन मध्ये नव्या स्वरूपातील करोना विषाणू आढळून आल्यावर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्तापर्यत जगातील ४३ देशांनी ब्रिटनशी असलेला संपर्क तोडून टाकला असून फ्रांसने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. ही मुदत सध्या ४८ तासांची असली तरी त्यामुळे इंग्लिश चॅनल समवेत सर्व वाहतूक मार्ग बंद केले गेले आहेत. परिणामी हजारो ट्रक रस्त्यात अडकले आहेत. ३६ किमीचा जाम लागला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ब्रिटनवर खाद्यान्न संकट घोंगावू लागले आहे. ब्रिटन मध्ये १/४ खाद्यान्न युरोपीय संघातून येते.

फ्रांस सरकारने या बाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असून ब्रिटन मधून फ्रांस मध्ये येणाऱ्या ट्रकचालकांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट देणे बंधनकारक केले आहे. ब्रिटनशी संपर्क तोडलेला हॉंगकॉंग हा आशियातील पाहिला देश आहे. चीनने ब्रिटन मधील नव्या करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सोमवार पूर्वी जे ब्रिटन मधून चीन मध्ये आले त्यांना दोन ऐवजी तीन आठवडे क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे तर द. कोरियाने हा कालावधी १४ दिवसांचा ठेवला आहे.

कॅनडा, सौदी, कुवेत, ओमान, डेन्मार्क, द.आफ्रिका, पोलंड, तुर्की, स्वित्झर्लंड, रशिया, जॉर्डन, हॉंगकॉंग, जर्मनी, इटली, नेदरलंड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, आयर्लंड, चिले, इस्रायल, बुल्गारीया या देशांनी ब्रिटन बरोबरची विमान सेवा स्थगित केली आहे.