जो बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर घेतली करोना लस

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी करोना लस घेतली असून ७८ वर्षीय बायडेन हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत. त्यांनी फायझरची करोना लस घेतली असून या लसीला अमेरिकेने अधिकृत मान्यता दिली आहे. अमेरिकन नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी आणि त्यांनी लसीकरण मोहिमेत सामील व्हावे यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून बायडेन यांनी लाईव्ह टीव्हीवर ही लस टोचून घेतली आहे.

बायडेन याना लसीचा पाहिला डोस दिला गेला असून त्यासंदर्भात काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे सांगितले जात आहे. बायडेन यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडीला सुद्धा लाईव्ह टीव्ही वर लस दिली गेल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका हे करोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले राष्ट्र असून येथील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. लसीकरण सुरु झाले असले तरी प्राधान्य क्रमाने लस दिली जात असून सर्वसामान्य नागरिकांना पुढील महिन्यापासून ही लस उपलब्ध होऊ शकेल असे समजते.