कोरोनावर नियंत्रणानंतर ‘सीएए’बाबत पावले उचलणार: अमित शहा


कोलकाता: कोरोना महासाथीमुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. कोरोनाच्या लसीकरणाचे काम सुरू होऊन त्याची साखळी खंडित होताच सुधारित नागरिकत्व कायद्यावर काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायद्याचे नियम तयार करण्याचे काम बाकी आहे. कोरोनामुळे अनेक कामे अडकून पडली आहेत. कोरोना लसीकरण जितक्या लवकर सुरू होईल आणि त्याची साखळी खंडित होईल, तितक्या लवकर आम्ही हे काम सुरू करू, असे शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. नड्डा यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला परत बोलावून केंद्रात प्रतिनियुक्तीवर घेण्याचा केंद्राला अधिकार आहे. ममता यांनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी नियमांचा अभ्यास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारच्या नाकर्तेपणापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी ‘स्थानिक आणि बाहेरचे’ असा वाद सुरू केला आहे, असा आरोप करून शहा म्हणाले की, प. बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास ‘भूमीपुत्र’च राज्याचे नेतृत्व करेल.