मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाताळ सण आणि नववर्षाच्या दृष्टीने नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पण, आता कोणतीही नवी नियमावली नववर्षाच्या स्वागतासाठी आखण्यात येणार नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांसाठी कोणत्याही गाईडलाइन्स नाहीत- पालकमंत्री
तरी देखील यंत्रणांची करडी नजर शहरातील सेलिब्रेशनवर असणार आहे. मुंबईकरांचा उत्साह आणि मायानगरीमध्ये येत्या दिवसांत होणारी गर्दी पाहता सर्वत्र कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या नियमांचे पालन मात्र अनिवार्य असेल. जो निर्णय हॉटेल आणि इतर ठिकाणे सुरु करण्याचा घेण्यात आला आहे, त्यांच्या एसओपीमध्ये नव्याने कोणतेही बदल करण्यात येण्याचा प्रश्नच नाही. कोरोना पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात याचे प्रमाण कमी झालेले आहे. जुन्या नियमावलीचा कालावधी वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो, पण नव्या वर्षासाठी वेगळी अशी नियमावली नसल्याचे अस्लम शेख म्हणाले.
कोरोनाच्या या संकटकाळात आनंदाची उधळण होत व्यापाऱ्यांचे आणि कोणाचेही नुकसान होणार नाही यावर भर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नियमावली नसली तरीही गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह यांसारख्या भागात गर्दी करण्यास मनाई असेल. शिवाय सेलिब्रेशन करतेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर सक्तीचा असेल याकडे त्यांनी पुन्हा लक्ष वेधले.
मुख्य म्हणजे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही नवी नियमावली नसली तरीही पुढील सहा महिन्यांसाठी सर्वांसाठी मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी आता प्रशासनाला नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.