भारतात गुंतवणूक करण्यासाठी सौदीचे नियोजन: राजदूतांचा निर्वाळा


नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटकाळातून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजना उल्लेखनीय आहेत. या संकटातून मार्ग काढण्याची भारताची क्षमता निर्विवाद असून भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सौदी अरेबियाकडून नियोजन सुरू असल्याचा निर्वाळा सौदीचे भारतातील राजदूत डॉ. सौद बिन मोहोम्मद अल साती यांनी वृत्तसांठेला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.

कोरोना संकटाची चाहूल लागण्यापूर्वी मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सौदीचे राजकुमार मोहोम्मद बिन सलमान यांनी भारतात १० हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयावर सौदी ठाम असून गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे नियोजन सुरू असल्याचे अल साती यांनी सांगितले.

पेट्रोकेमिकल्स, तेल शुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरी), तेल खाणी, पायाभूत सुविधा, तेल उत्पादन, कृषी, औद्योगिक उत्पादन अशा अनेक क्षेत्रात भारतात गुंतवणूक करण्यास सौदीला रस आहे. भारत हा सौदी अरेबियाचा धोरणात्मक भागीदार आणि निकटवर्तीय मित्र आहे. सध्या दोन देशांमध्ये माहिती आदान प्रदान, प्रशिक्षण, दहशतवाद विरोधी लढा अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहेत. मात्र, दोन्ही देश त्यातून मार्ग काढण्यात यशस्वी ठरत आहेत. या संकटातून दोन्ही देश बाहेर आले तर विभागातील अन्य देशांच्या अर्थव्यवस्था सावरण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असा विश्वास अल साती यांनी व्यक्त केला.

भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी मागील आठवड्यात सौदीला भेट देऊन सौदी लष्करप्रमुखांशी विस्तृत चर्चा केली. मात्र, या चर्चेचा तपशील देण्यास अल साती यांनी नकार दिला. धोरणात्मक भागीदारी समितीच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संरक्षण, सुरक्षाविषयक सहकार्य आणि दहशतवादविरोधी लढ्यातील सहभागामध्ये सहकार्याचे अनेक मार्ग खुले झाल्याचे त्यांनी सांगितले.