लद्दाख, डोकलामच्या ‘खलनायक’ चिनी सैन्याधिकाऱ्याची बदली


बीजिंग: भरताना भुतांविरोधासाठी ओळखले जाणारे आणि लद्दाख, डोकलाम येथील संघर्षात भारतासाठी ‘खलनायक ठरलेले पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम विभागाचे प्रमुख जनरल झाओ झोंकी यांची चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बदली केली आहे. त्यांची जागा जनरल झांग घेत आहेत.

त्यांच्या जागी आलेले जनरल झांग यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही भारत-चीन सीमारेषेवर काम केलेले नाही. या भूभागाच्या कामाचा अनुभव नसलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच पश्चिम विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे. भारत- चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सैन्याधिकाऱ्यांच्या आगामी बैठकीतील प्रतिसाद आणि देहबोलीवरून पीपल्स लिबरेशन आर्मीमधील धोरणात्मक अंत:प्रवाहांची दिशा समजू शकेल, असे भारतीय सैन्याधिकाऱ्यांने सांगितले. चिनी निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार जनरल झांग यांना जनरल झोंकी यांच्याप्रमाणे काही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत. लष्करी अधिकारी म्हणून व्यावसायिक गुणवत्तेवर निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात.

जनरल झाओ यांनी यापूर्वी डोकलाम आणि सध्या सात महिन्यांपासून लद्दाख येथील भारत- चीन तणावात तेल ओतण्याचे काम केले आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आणि मेच्या सुरूवातीस पीपल्स लिबरेशन आर्मीला पॅंगॉंग त्सो परिसरात भारतीय भूभागात घुसखोरी करण्यासाठी जनरल झाओ यांना क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय सैन्य कमिशनची मान्यता होती. मात्र, चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात केलेल्या दु:साहसामुळे दोन्ही देशातील तणाव कमालीचा वाढला आणि त्यामुळे जिनपिंग प्रशासनात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली, असा भारतीय सैन्यदल आणि राजनैतिक स्तरावरील कयास आहे. गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या जोवाघेण्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. चीनने त्यांच्या मनुष्यहानीची संख्या लपविली तरी भारतीय सैन्यापेक्षा अधिक असल्याचे मानले जात आहे.