महापालिका निवडणुकांसाठी नव्या अध्यक्षांचा स्वबळाचा नारा


पुणे: यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेले आमदार भाई जगताप यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा नारा दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर काँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवार द्यावे, असे पक्षाचा मुंबईचा प्रमुख म्हणून आपले मत असल्याचे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबई महापालिकेत एकेकाळी काँग्रेसचे संख्याबळ उल्लेखनीय होते. सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या ७५ च्या दरम्यान असायची. मागील १० वर्षात ही संख्या केवळ ३०-३५ वर आली आहे. अधिक संख्येने नगरसेवक निवडून आणण्याच्या निर्धाराने मुंबई काँग्रेस पूर्ण ताकदीने लढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पडणार असल्याची ग्वाही देतानाच मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम अशा अनेक नेत्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मेट्रो कारच्या विषयाचे भारतीय जनता पक्षाने राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका निवडणुकीत सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा राजकीय मुद्दा उद्भवणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.