भारताला सुरक्षा परिषदेत स्थान आवश्यक: झिम्बाब्वे


नवी दिल्ली: भारताने आधुनिक जगाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले असून भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळणे आवश्यक आहे, असे मत झिम्बाब्वेचे भारतील राजदूत डॉ. जी एम चिपरे यांनी व्यक्त केले.

कॉन्फेडरेशन ऑफ यंग लीडर्सने आयोजित केलेल्या ऑनलाईन परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या मागणीला झिम्बाब्वेचा पाठींबा असल्याचे डॉ. चिपरे यांनी सांगितले.

सध्याची जागतिक प्रशासन व्यवस्था गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळापूर्वी ही व्यवस्था निर्माण करण्यात अली आहे. सध्या ती कालबाह्य झाली आहे. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य म्हणून भारताचा समावेश करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. निर्बंधात्मक चळवळ, व्यापार आणि विकास या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारताने पार पाडलेली महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारत सकारात्मक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्याची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रचना जुनाट आणि कालबाह्य आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला या परिषदेत स्थान देणे गरजेचे आहे. सुरक्षा मंडळाच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना झिम्बाब्वेचे समर्थन आहे, असे डॉ. चिपरे यांनी स्पष्ट केले. आफ्रिकन देशालाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

भारत एक जानेवारीपासून सुरक्षा परिषदेत २ वर्षांच्या कालावधीसाठी स्थान ग्रहण करणार आहे. या काळात संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात येईल. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ठळक मुद्दे कथन केले होते.