शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू: सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण


नवी दिल्ली: नव्या कृषिकायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आजपासून शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपायोशन सुरू केले आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी चर्चेच्या पुढच्या फेरीसाठी दिवस निश्चित करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.

शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकार आणि संघटना यांच्यात चर्चेच्या ५ फेऱ्या पार पडल्या. या सर्व चर्चा निष्फळ सरकारने तिन्ही कायदे पूर्णपणे रद्द करावे, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण आज (सोमवार)पासून सुरू झाले आहे. सिंघू सीमेसह सर्व आंदोलनस्थळांवर ११ शेतकऱ्यांचा एकेक गट २४ तास उपोषण करणार आहे, अशी माहिती स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी दिली.

आतापर्यंत चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या असल्या तरी चर्चेतून मार्ग काढण्याच्या उद्देशाने सरकारने संघटनांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. यापूर्वीच्या चर्चेत सरकारकडून कायद्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावात कोणत्या अडचणी आहेत ते संघटनांनी चर्चेमध्ये मांडावे, असे आवाहन सरकारने केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर येत्या २ दिवसात शेतकरी संघटनांशी चर्चा करतील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.