शेतकरी संघटनेवर विदेशातून अवैध निधी आणल्याचा आरोप


नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनात महत्वाची भूमिका निभावणार पंजाबमधील मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनवर कायदेशीर प्रक्रीया पूर्ण न करता विदेशातून निधी आणल्याबाबत बँकेने तंबी दिली आहे.

संघटनेला मागील दोन महिन्यात मिळालेल्या ८ ते ९ लाख रुपयांच्या देणगीबाबत संघटनेचे सरचिटणीस सुखदेवसिंग कोकरी यांना पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले. त्यांना फॉरेक्स विभागाच्या मेळाबद्दल सांगण्यात आले. ही देणगी विदेशातील पंजाबी देणगीदारांकडून आलेली आहे. हे देणगीदार नियमितपणे सामाजिक कार्यासाठी देणगी देत असतात, अशी माहिती कोकरी यांनी दिली.

या देणगीसंदर्भात बँकेकडून लेखी नोटीस मिळाल्यावर त्याला संघटनेच्या वतीने उत्तर देण्यात येईल. ही देणगी देणारे लोक पंजाबी अनिवासी भारतीय आहेत. ते आम्हाला मदत करीत आहेत. याला आक्षेप असल्याचे काय कारण? त्यासाठी आम्ही कोणत्या कमिशन एजंटची मदत तर घेत नाही ना, असा सवाल संघटनेचे प्रमुख जोगिंदर उग्रा यांनी केला.

मागील वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांच्या निधी उभारणीबाबतचे नियम केंद्र सरकारने कडक केले असून त्याचे उल्लंघन केल्याबद्दल अनेक संस्थांवर कारवाईदेखील केली आहे.