सोनियांचे पत्र हे दबावाचे राजकारण नाही: शिवसेना


मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र हे दबावाचे राजकारण नसल्याचा निर्वाळा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. ते सामोपचाराने राजकारण करतील, असे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारला आपल्या कार्यकाळातील बहुतेक कालावधी कोरोना संकटाचा सामना करण्यात गेला. त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील काही कामे प्रलंबित राहिली आहेत. या प्रलंबित कामांची आठवण काँग्रेसने करून दिली आहे. त्यामध्ये दबावाचे राजकारण नाही, असा खुलासा राऊत यांनी केला आहे. ही कामे राज्याच्या हिटाची असल्याने त्याचे स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.

किमान समान कार्यक्रमातील प्रलंबित कामांचीआठवण करून देण्यासाठी सोनिया गांधी यांनी ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. काहीश्या नाराजीनेच काँग्रेस आपल्या विचारसरणीशी विपरीत असलेल्या शिवसेनेबरोबर जाऊन महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर काँग्रेसकडून प्रथमच असे पत्र देण्यात आले आहे.